Monday, August 26, 2013

सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..

बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का?



जागतिकीकरणाने आलेला चंगळवाद समाजामध्ये भोगविलासी प्रवृत्ती वाढवत असताना बाराव्या-तेराव्या शतकातील सनातन मानसिकतेला २१व्या शतकात बुवा-बाबांनी खतपाणी घातले आहे. धर्मशास्त्रातील श्रृती-स्मृतींचा आधार घेऊन कर्मकांडे वाढवणारे धर्ममार्तंड सामाजिक प्रश्नांवर सनातनी निर्णय देत असतात. तोच प्रकार जातपंचायतीच्या रूपाने हेतुपुरस्सर वाढवला जात आहे. या सनातन प्रवृत्तींनी आणलेल्या सामाजिक विषमतेने समाज जीवन गढूळ केले. जुनाट रुढी-परंपरांचे जोखड समाजावर बसवले आणि त्यालाच धर्मतत्त्वज्ञानाचा मुलामा देऊन सर्वसामान्य माणसांची आणि महिलांची गळचेपी केली. धर्माच्या नावाखाली बोकाळलेल्या अपप्रवृत्तींनी महिलांना शुद्रातिशुद्रांच्या पंक्तीत बसवून त्यांच्याप्रमाणेच हीन लेखले. महिलांकडे केवळ भोगवस्तू म्हणून तुच्छतेने बघण्याची प्रवृत्ती, जातीय विषमता आणि पुरुषी अहंभाव रुजवण्याचे आणि अंधश्रद्धा वाढवण्याचे काम झाले. त्यावर प्रहार करण्याचे काम संतांनी केले. संतांनी अंधश्रद्धांमधील खोलपणा दाखवून सुधारणांचे मार्ग सांगितल्यामुळे संतांचा पुरोगामी वारसा पुढे चालवणारे फुले-शाहू-आंबेडकर घडले; परंतु पुरोगामी विचाराने सर्वधर्मसमभाव आणि जात-धर्म विरहित समाज निर्माण झाला तर राजसत्ता आणि राजसत्तेतून धर्मसत्ता मिळवणे कठीण असल्याने सनातन प्रवृत्तींनी उचल खाल्ली आहे. बुवा-बाबांचे आणि कर्मकांडांचे उदात्तीकरण केले जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाविरुद्ध उभे ठाकलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या हा सनातन्यांच्या कटाचाच एक भाग आहे आणि महिलांना तुच्छ समजणार्‍या सनातन शक्तींनीच 'शक्ती' मिल कम्पाऊंडमध्ये एका छायाचित्रकार-पत्रकार महिलेवर सामूहिक बलात्कार केला. महात्मा गांधींचा खून करणारी सनातन प्रवृत्ती कशी वाढत राहिली, याचीच ही ठळक उदाहरणे आहेत.

'पाप के चार हथीयार' या आपल्या एका निबंधात सुप्रसिद्ध साहित्यिक हजारी प्रसाद द्विवेदी यांनी म्हटले आहे की, १) विचार मारायचा असला की, चांगला विचार सांगणार्‍याला प्रथम विरोध करतात. २) विरोध करून ऐकला नाही तर त्याला छळतात. ३) छळवणुकीनंतरही विचार रुजवत राहिला तर त्याला मारतात. ४) त्याचा विचार समूळ नष्ट करायचा तर त्याचा पुतळा करतात आणि विचार संपवतात. पुरोगामी विचारांची सर्मथ परंपरा चालवणार्‍या संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी सर्व संतांनी हिंदू धर्मातील विषमतेवर प्रहार केल्यामुळे त्यांचा छळ झाला. ज्ञानेश्‍वरांना वाळीत टाकले आणि संत तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली म्हणून त्यांचे विचार संपले नाहीत. गाथा वर आली ती वारकर्‍यांनी तारली. वारकरी पंथामध्ये मराठा, कुणबी, माळी, तेल्यांपासून महारांपर्यंत सर्व अलुतेदार, बलुतेदार सहभागी झाले. त्या सर्वांनी संतांचे विचार टिकवले. जे विचार करतात, त्यांना तारणे हे व्यक्तीच्या नव्हे समष्टीच्या हातात असते. बुद्धीप्रमाण्यवादी, स्वच्छ, स्पष्टवक्ते, विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोळकर हे सर्वसमावेशक मवाळ क्रांतिकारक होते. त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यांच्याविरोधात आंदोलन उभारले. त्यांचा विचार मारण्याचे काम सनातत्यांनी जाणीवपूर्वक केले. जनसामान्यांना पालखीचे भोई बनवणार्‍या प्रवृत्तींनीच ज्ञानेश्‍वरांचा अनन्वीत छळ केला आणि तेच रथावर बसले. अशा मंबाजींनी डॉ. दाभोळकरांचा खून केला. असे मंबाजी आज समाजकारण, राजकारण, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आणि पत्रकारितेतही आहेत.

जादूटोणाविरोधी आणि अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला वारकर्‍यांचा विरोध होता, असा जावईशोध लावण्यात आला. बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का? वारकर्‍यांचा बुद्धिभेद करणार्‍या बडव्यांच्या तुरुंगातून वारकर्‍यांनीच विठ्ठल सोडवला. याचाही विचार झाला पाहिजे.

केंद्र आणि राज्य सरकारने डॉ. दाभोळकरांची दिवसाढवळय़ा हत्या करून पुरोगामित्वाचा गळा घोटू पाहणार्‍या मारेकर्‍यांना पकडून त्यांना समाजासमोर आणले पाहिजे. डॉ. दाभोळकर हे कोणी धर्माचे प्रेषित नव्हते, समाजातील वेडगळ समजूत दूर करून समाज सुदृढ करण्याचे व्रत घेतलेला एक साधासरळ कार्यकर्ता होता. अंधश्रद्धा विधेयकातील धार्मिक भावना दुखावणार्‍या तरतुदी काढून टाकण्यालाही त्यांनी संमती दिली होती. तरीदेखील सत्ताधार्‍यांनी हे विधेयक मंजूर करण्यास टाळाटाळ केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा उद्घोष करून सलग तीन वेळा सत्तेत येणार्‍यांनी या विधेयकाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. एरवी विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये गोंधळ झाला असता, त्या गोंधळातच अनेक विधेयके चर्चेविना मंजूर केली जातात. परंतु हे विधेयक मंजूर केले नाही. एकप्रकारे सनातनवाद्यांना सरकारनेच ढिल दिली. विधेयक मंजूर झाले असते तर सनातन्यांना नाइलाजाने गप्प बसावे लागले असते. परंतु ढिल मिळाल्यामुळे डॉ. दाभोळकरांच्या हत्येचे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी प्रतिगाम्यांना बळ मिळाले. सनातनी प्रवृत्तीने गेल्या गुरुवारी आणखी एक बळी घेतला. पत्रकारितेच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवलेल्या बावीस वर्षांच्या एका छायाचित्रकार मुलीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. मुंबईच्या शक्ती मिल कम्पाऊंडमध्ये आपल्या सहकार्‍याबरोबर बातमीसंबंधी छायाचित्रण करण्यासाठी ही मुलगी गेली होती. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा आक्रोश क्षमण्याआधीच ही घटना घडली आणि पुनश्‍च गल्लीपासून दिल्लीपर्यंत संतापाचा उद्रेक झाला. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पुरता झाकोळून गेला. मुंबई हे सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याची शेखी आम्ही मुंबईकर मिरवत होतो. पण आमची मान शरमेने खाली गेली. या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह तर लागलेच; पण महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकार आणि लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले. राज्य विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य प्रतिस्पध्र्यांना नामोहरम करण्यासाठी अथवा आमदार निधीत वाढ करण्यासाठी गोंधळ घालतात. सभागृहाचे कामकाज बंद पाडतात; पण महिलांचे प्रश्न व बलात्कारासारख्या घटनांसाठी एवढा जोराचा आवाज उठवला जात नाही. सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला शक्ती उभी राहिली आहे. तिचे पद्धतशीर खच्चीकरण केले जात आहे. तिला शक्तिहीन करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. स्त्रीची गर्भातच हत्या केली जाते आणि दोन वर्षांच्या बालिकेपासून सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ महिलेपर्यंंत प्रत्येकीला बलात्काराला सामोरे जावे लागत आहे. अल्पवयीन मुली, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी, नोकरी-व्यवसाय करणार्‍या महिला, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक महिला अशा सर्व वयोगटातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्याच सप्ताहात पुण्याजवळ दौंडमध्ये पाचवी इयत्तेतील अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. यापूर्वी सातारा, जळगावमध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून जन्मदात्या माता-पित्यांनीच मुलीचा बळी घेतला. रेशनकार्डासाठी गेलेल्या चेंबूर गृहिणीवर रेशनकार्ड एजंटानेच बलात्कार केला. एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने महिलेवर बलात्कार केला. मुंबईत कफ परेडमधील झोपडपट्टीत अडीच वर्षांंच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. हिंगोलीत उपचारासाठी दवाखान्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. बलात्काराचे सत्र सुरूच असून, अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यात नोंदवून घेतली जात नाहीत. सरकारने विधिमंडळात दिलेल्या एका लेखी उत्तरामधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २0१२ या कालावधीत राज्यात बलात्काराच्या १७0४ घटना घडल्या आहेत. बलात्काराचे १४ हजार ४१४, विनयभंगाचे ३१ हजार ४१२ व छेडछाडीचे ९ हजार ४८0 प्रकरणे विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. गतवर्षी झालेल्या बलात्काराच्या १७0४ घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराची संख्या ९२४ आहे. ही सर्व प्रकरणे जलदगती न्यायालयांमध्ये वर्ग करण्याच्या सूचना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्या आहेत. तथापि जोपर्यंंत बलात्कार्‍यांना कडक शासन होत नाही, तोपर्यंंत पोलिसांचा अथवा कायद्याचा धाक वाटणार नाही. ही सर्व प्रकरणे पाहता सरकारच्या आणि समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत की काय, असे वाटत असून, यामुळे सनातन शक्ती प्रभावी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP